“त्या ” महिलेला विरोधी पक्षातून चिथावणी ; पोलीस कारवाईची नगराध्यक्ष माईणकर यांची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत स्टॉलवर कारवाई करताना सौ. अंजली शिवगण या महिलेने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. तो प्रकार गंभीर आहे. परंतु हा प्रकार त्या महिलेला काही विरोधी पक्षाच्या मंडळींनी करण्यास भाग पाडला आहे. त्यामुळेच या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. त्या महिलेला भडकवणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करा व संबंधितावर कठोर कारवाई करा. या मागणीचे निवेदन वाभवे – वैभववाडीच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी पोलीस निरीक्षक श्री.अवसरमोल यांना दिले आहे.

सुशोभीकरण करण्यात आलेल्या ठिकाणीच स्टॉलधारक सौ. शिवगण यांनी स्टॉल उभा केला. शुक्रवारी त्या स्टाॅलवर कारवाईस गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समोर त्या महिलेने डीझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु ती डिझेलची बाटली तिथे आली कशी? ती कोणी आणली. हा पूर्व नियोजित कट होता का?  त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत हे उपस्थित असल्याचे दिसत आहेत. ते त्या ठिकाणी कोणत्या उद्देशाने उपस्थित राहिले होते. सावंत व त्या महिलेचे घटनेपूर्वी काही संभाषण झाले आहे का? यासाठी त्या महिलेचे कॉल डिटेलस रेकॉर्ड तपासावे. व खरा सूत्रधार शोधून काढावा असे निवेदनात माईंणकर यांनी म्हटले आहे.

अंगावर ओतून घेतलेले डिझेल होते का ? याची शहानिशा करावी. डिझेल असल्यास ते इतक्या सहजासहजी उपलब्ध कसे झाले. त्याचीही तपासणी करावी. कोणी आणून दिले ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधावे. व संबंधितावर कठोर कारवाई करावी. बाटलीमध्ये डिझेल वैभववाडी शहरात कुठेही मिळत नाही. मग या महिलेस इतक्या प्रमाणात कसे मिळाले. विरोधी पक्षाची जी काही मंडळी उपस्थित होती. त्या व्यक्तीवर दाट संशय आहे. त्यांनी सदर  महिलेस अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. असा गंभीर आरोप निवेदनातून माईणकर यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या महिलेला आम्ही ओळखतो. ती टोकाचे पाऊल उचलू शकत नाही. कोणीतरी तीला हे करण्यास भाग पाडले आहे. वैभववाडी सुसंस्कृत आणि शांतता प्रिय शहर आहे. नगरपंचायत विकास करत असलेल्या गोष्टींवर काही अपप्रवृत्ती या जाणीवपूर्वक नगरपंचायतीची बदनामी करीत आहेत. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निवेदनात माईणकर यांनी म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, वित्त व बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक राजन तांबे, सुंदरी निकम, रामचंद्र बावदाणे, प्रकाश सावंत, अवधूत नारकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!