सिंधुदुर्गात कलाकार मानधन उद्दिष्ट संख्या 100 ऐवजी 200 करावी

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार मानधन प्रस्ताव साठी असलेली 100 संख्येची मर्यादा वाढवून 200 करावी अशी आग्रही मागणी राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मुंबई येथील विधीमंडळात भेट घेत केली. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा एकमेव जिल्हा आहे.भजन, ठाकर कला दशावतार अशा कला सादर करणाऱ्या कलाकारांची संख्या सिंधुदुर्गात वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्य शासनाकडून कलाकार मानधन साठी वार्षिक केवळ 100 प्रस्तावांचे उद्दिष्ट आहे. साहजिकच उद्दीष्ट कमी असल्यामुळे अन्य कलाकार मानधनापासून वंचित राहतात.यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 100 ऐवजी दरवर्षी 200 कलाकार मानधन प्रस्ताव उद्दिष्ट मंजूर करावे अशी मागणी कानडे यांनी केली.आमदार नितेश राणे यांनी या मागणीला दुजोरा दिला असून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्वतः सिंधुदुर्गात 200 कलाकार मानधन उद्दिष्ट ठेवण्यास मान्यता दिली आहे.

error: Content is protected !!