मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, तिघांचा एकत्रित फोटो बॅनरवर, फिल्मी स्टाईलने बॅनरबाजी

‘त्रिदेव अजिंक्य’ म्हणून बॅनर झळकले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दणका दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पहिला हप्ता राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला. पुण्यामध्ये जंगी कार्यक्रम करून या योजनेची औपचारिकपणे सुरुवात करण्यात आली. दरम्यान, योजना यशस्वी होत असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. कोल्हापूरमध्ये याच पार्श्वभूमीवर आता ‘त्रिदेव अजिंक्य’ म्हणून बॅनर झळकले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात फिल्मी स्टाईलने बॅनर लावले आहेत. ‘त्रिदेव अजिंक्य’ असा मजकूर असलेले बॅनर कोल्हापूरमध्ये लागले असल्याने चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचा एकत्रित फोटो बॅनरवर असून यशस्वी कारभाराचा दाखला देत ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केल्यानंतर आता महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवरच महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ या आठवड्यात कोल्हापूरमधून केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह आमदार, खासदार कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणार आहेत. या दौऱ्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर ही फिल्मी स्टाईलने बॅनरबाजी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!