मालवण (प्रतिनिधी) : दिनांक 21 ऑगस्ट रोजी पुन्हा नांदोस गावाची ग्रामसभा कोरम अभावी तहकुब झाली. तहकूब झाली की तहकूब करण्यात आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिसेंबर 2022 मध्ये ग्रामसभेची नवीन बॉडी निवडून आल्यापासून नांदोस गावातील ग्रामपंचायतचा कारभार संशयास्पद झालेला आहे. गावच्या सरपंच राजकारणात पूर्णपणे नवख्या असल्याचा गैरफायदा घेतला जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सन 2023 आणि 2024 मध्ये नांदोस गावात धड ग्रामसभा होत नाहीत. याचे कारण किंवा एवढेच आहे की, ग्रामसभेची तारीख जाहीर करून ती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जात नाही. मे 2024 मध्ये तर ग्रामसभेसाठी सरपंच माधुरी चव्हाण व फक्त दोन ग्रामस्थ हजर होते, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना देखील सदर ग्रामसभेत हजर राहावे असे वाटले नाही. मात्र पुढील आठवड्यातील मासिक सभेला सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते, जो एक सदस्य आपल्या कामानिमित्त कुठेतरी गेला होता त्याला देखील बोलावून घेण्यासाठी उपसरपंच विजय निकम यांनी माणूस पाठवला.
या संदर्भात मागील ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ मंडळींनी एकमताने ग्रामसभे बाबत लाऊड स्पीकरने अनाउन्सिंग करावे, अशी मागणी केलेली होती. मात्र उपसरपंच विजय निकम यांनी ती मागणी धुडकावून लावून आम्ही ग्रामसभेचा अजेंडा घरोघरी फिरवू असे सांगितले. मात्र 21 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या ग्रामसभेचा अजेंडा 16 ऑगस्ट 2024 पासून काही ठराविक लोकांच्या घराकडे नेऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. संपूर्ण गावामधून सदर अजेंडा फिरवण्यात आलाच नाही. तसेच गाव कामगार, गावातील शिक्षक इत्यादी शासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामसभेची पूर्वकल्पना देणे बंधनकारक असतानाही तशी कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामसभेला शंभर माणसांची उपस्थिती झाली नाही. म्हणून सत्तरहून जास्त लोक उपस्थित असतानाही कोरम अभावी आजची ग्रामसभा तहकूब करण्यात आली. ग्रामसभा तहकूब करून कमीत कमी उपस्थितीमध्ये ग्रामसभा घेण्यामागे ग्रामपंचायत बॉडीचे नेमके काय हेतू आहेत हे काळच दाखवेल. यापूर्वीही अशाच प्रकारे ग्रामसभा तहकूब करून ग्रामपंचायत बॉडीने आपल्या मर्जीतील लोकांना वेगवेगळ्या समित्यांवर घेतलेले आहे तसेच शासकीय कामे आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना दिलेली आहेत.
सभागृहामध्ये जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या समोर 2023-24 ग्रामसभेच्या इतिवृत्ताची नोंदवही ग्रामस्थांनी बघायला मागितली असता ग्रामसेवक सुशांत चौगुले यांनी सदर वही कवटाळून घेऊन कोणालाही बघायला दिली नाही. तीन-चार दिवसानंतर वही दाखवतो असे सांगून वेळ मारून जाण्याचा प्रयत्न केला. सदर वहीमध्ये असे नेमके काय काळे बेरे आहे जे लपवण्याचे प्रयत्न ग्रामसेवक सुशांत चौगुले करत आहेत ? की न घेतलेल्या ग्रामसभांचे नसलेले रेकॉर्ड त्यांना तयार करायचे आहे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
यापूर्वी सरपंच माधुरी चव्हाण यांनी उपसरपंच विजय निकम व ग्रामसेवक सुशांत चौगुले हे आपसात ठरवून मला त्याप्रमाणे वागायला भाग पाडतात, अशी कबुली नांदोस चव्हाणवाडीतील सुमारे 40-50 लोकांच्या समोर दिलेली आहे. त्यामुळे नांदोस गावाचा दरबार अधांतरी पडलेला दिसून येत आहे असे अशोक नांदोसकर यांनी म्हटले आहे.












