कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेच्या संचालकांच्या परदेश दौऱ्यात सुरुवातीला अपुऱ्या माहितीच्या आधारे तिकिटे काढण्यात आली. व्हिसा नसल्याने यात 11 लाख 84 हजार रुपये वाया गेले. त्यानंतर झालेल्या बैठकीत संचालकांमध्ये वादावादी झाली व पुन्हा तिकिटे काढण्यात आली. जनतेच्या पैशाची अशी किती उधळपट्टी केली जाणार? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
सुरुवातीला ज्या संचालकांचा व्हिसा नाही अशा संचालकांची ही तिकिटे काढण्यात आली. तिकीट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता ही न करता काढण्यात आलेल्या तिकिटांमुळे जिल्हा बँकेचे 11 लाख 84 हजार रुपये वाया गेले. ज्यांना तिकिटे काढण्याबाबतची प्रोसिजर माहित नाही असे संचालक परदेश दौरा करून नेमके काय साध्य करणार आहेत. स्विझरलँडमध्ये बर्फातील शेती पहायला गेलेत का? असा सवाल ही उपरकर यांनी केला आहे.
या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा बँकेकडून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची कशी उधळपट्टी केली जाते हे समोर आलेले आहे. सुरुवातीला काढलेली तिकिटे रद्द करावी लागल्यानंतर 22 जुलैला झालेल्या बैठकीत मोठी वादावादी झाली आणि या वादावादी नंतर पुन्हा तिकिटे काढण्यात आली. त्यामुळे हा दौरा केवळ पर्यटन असून त्यातून जिल्हा बँक किंवा जनतेला कोणताही फायदा नाही. परदेश दौऱ्यावर गेलेल्या या संचालकांना तेथे जाऊन जिल्हा बँकेच्या हितासाठीचे काय समजणार आहे असा सवालही उपरकर यांनी केला आहे.