कासार्डे विद्यालयाच्या शिक्षिका विधी मुद्राळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीत राज्यात प्रथम

शिक्षणमंत्र्याच्या उपस्थितीत हस्ते पुणे येथील कार्यक्रमात ५० हजार रु पारितोषिक देऊन गुणगौरव

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सहाय्यक शिक्षिका विधी वैभव मुद्राळे यांना शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील जिल्हा व राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख अतिथी अर्चना अवस्थी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

उच्च माध्यमिक गणित विभागात जिल्ह्यात प्रथम रू. १०,००० आणि राज्यातही प्रथम क्रमांक रोख ५० हजार रुपये, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे विधी मुद्राळे यांना दिलेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे च्या महात्मा फुले सभागृहात या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर, आयटी विभागाचे सोनावणे, मुळये आदी उपस्थित होते.यावेळी विविध गटातील विजेत्या ८४ शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार ५० हजार रु , द्वितीय ४० हजार तर तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले.राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी, या साठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डीएड, शिक्षक व मुख्यद्यापकांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी व्हिडीओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती.अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील, असा विश्वास राज्य शिक्षण सचिव श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला. स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल राज्यभरातील शिक्षकांचे कौतुक केले.

या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व संस्था पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बिसुरे बी.बी. पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.सौ.मुद्राळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!