सिंधु बझार इमारतीचे लवकरच विस्तारीकरण..!

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : मागील वार्षिक सांगितल्याप्रमाणे मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यात आली आहे. तसेच पर्यटक निवास इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. आता संघाच्या सिंधू बझार मध्ये होणाऱ्या गर्दीमुळे ग्राहकांना जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे सिंधू बझारचा विस्तार करण्यात येणार असून वर्षभरात हे काम मार्गी लागणार असल्याचे आज झालेल्या मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाने स्पष्ट केले.

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा चेअरमन राजन गावकर यांच्या अध्यक्षतेखाली दैवेज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, संचालक महेश मांजरेकर, के. पी चव्हाण, अशोक तोडणकर, विजय ढोलम, प्रफुल्ल प्रभू, महेश गावकर, अमित गावडे, रमेश हडकर, सुरेश चौकेकर, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई, सरोज परब, अमृता सावंत, व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संघाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच वर्षभरात जास्तीत जास्त साहित्य खरेदी करणाऱ्या दोन सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

चतुर्थी कालावधीत जीव तोडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा शब्द पूर्ण केल्याबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव राजन भोजणे यांनी मांडला. मागील इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देताना दोन्ही अभिनंदन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

प्रास्ताविकात चेअरमन राजन गावकर हजारो सभासद, ग्राहकांच्या सहकार्याने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. ग्राहकांचे समाधान, मालाचा उत्तम दर्जा विनम्र सेवा या तत्वावर काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थेचे स्वतंत्र खत गोडाऊन असावे यादृष्टिने संस्थेने मालवण तालुक्यातील कातवड खैदा येथे स्वतंत्र खत गोडाऊन बांधून गेल्या वर्षी कार्यान्वित केले आहे. शहरात येणाऱ्या ग्राहकांना खत घेते वेळी शहरातून खैदा कातवड येथे जावे लागत असल्याने शहरात मुख्य कार्यालयाजवळ गोडाऊन असावे अशी मागणी होत आहे. व्यापाराच्या दृष्टीने हि मागणी योग्य असल्याचे संचालक मंडळाचे मत असून शहरात मुख्य कार्यालयाजवळ गोडाऊन सुरु करण्याबाबत संस्था विचार करीत आहे. संस्थेच्या नविन सिंधुसागर या इमारतीचे बांधकाम तळमजला, ६ व्यापारी गाळे बांधून पुर्ण झाले असून येत्या दिवाळीच्या अगोदर पूर्ण क्षमतेने व्यापारी गाळ्यांचा वापर सुरु करण्याचे नियोजन संस्थेने केले आहे. उर्वरीत बांधकाम टप्याटप्याने पूर्ण करण्यात येत आहे. आपल्या संस्थेचा सिंधू बझार व्यवसाय प्रतिवर्षी वाढत असून गर्दीच्या हंगामात ग्राहकांना सिंधु बझार इमारतीतील जागा अपुरी पडत आहे. व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने सिंधु बझार इमारतीचे विस्तारीकरण करुन प्रशस्त बाजार सुरु करण्याचे धोरण संस्था तयार करत असून लवकर या कामाची अमंलबजावणी करण्यात येईल. शेतकऱ्यांची सेंद्रिय खताची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांसी व कृषी क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींशी चर्चा करता उपलब्ध सेंद्रिय पदार्थांपासून खत निर्मिती सारखा प्रकल्प हाती घेण्याबाबत संस्था चाचपणी करत असून तज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

अहवालात अनेक चुका : अहवालात अनेक चुका असल्याचे सभासदांनी निदर्शनास आणून दिल्या. काही चुका गंभीर असून यापुढे अशा चुका टाळून वार्षिक सभेच्या किमान आठ दिवस आधी अहवाल सभादांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सभासदांनी सांगितले.

जमीन विकण्यास परवानगी : संस्थेची कुसरवे येथील सर्व्हे नंबर 149/1/5 जागा विनावापर आहे. त्या जागेत जाण्या येण्यास रस्ता नाही. ती जागा विकून त्या ऐवजी कट्टा, कुंभारमाठ येथे जागा घ्यावी किंवा जागा विकून मिळणाऱ्या रकमेचे योग्य नियोजन करून जागा विकण्यास सभादांनी आजच्या वार्षिक सभेत परवानगी दिली. या सभेत राजन भोजणे, संतोष लुडबे, महेश लुडबे, दाजी हडकर, मुकुंद पार्टे, मनोज लुडबे, अनिल न्हीवेकर, आप्पा चव्हाण, उमेश मांजरेकर, सुधीर धुरी, प्रसाद आडवणकर, संदीप ढोलम, मोहन चव्हाण, भगवान लुडबे, अरुण तळगावकर, प्रमोद कांडरकर, आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!