अध्यक्ष राधाकृष्ण जोशी यांच्याकडून ट्रस्टसाठी तीन लाखाची देणगी जाहीर
चौके (प्रतिनिधी) : गुरुवर्य काकतकर विद्यार्थी कल्याण ट्रस्ट तर्फे चौके येथे महिलांसाठी फॅशन डिझायनिंगचा मोफत शिवण क्लास वर्ग सुरू करण्यात आला. त्याचे उद्घाटन गुरुवर्य काकतकर यांच्या कन्या राधिका जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राधाकृष्ण जोशी आणि उपाध्यक्ष कृ. बा. करलकर हे सुद्धा उपस्थित होते. ट्रस्टचे उपाध्यक्ष कृ. ब. करलकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून गुरुवर्य काकतकर ट्रस्टची उद्दिष्टे सांगताना ट्रस्ट आजी- माजी विद्यार्थ्यांसाठी घेत असलेल्या कार्याचा आढावा घेतला. तसेच या क्लासमध्ये महिलांनी उत्तम कौशल्य आत्मसात करून शिवण व्यवसायाद्वारे आपल्या संसाराला हातभार लावावा असे आवाहन करलकर यांनी यावेळी केले. गुरुवर्य काकतकर सरांच्या कन्या व कार्यक्रमाच्या उद्घाटक राधिका जोशी यांनी ट्रस्टच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून उपक्रमासं शुभेच्छा दिल्या.
तर यावेळी ट्रस्ट अध्यक्ष राधाकृष्ण जोशी यांनी महिलांनी आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. आणि यावेळी ट्रस्टला तीन लाख रुपये देणगीही जाहीर केली. तसेच या क्लासच्या परीक्षेत यशस्वी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे 1500, 1000 आणि 500 अशी रोख बक्षिसे स्वतः देणार असल्याचे जाहीर केले.
यानंतर ट्रस्टचे सचिव अशोक शृंगारे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी खजिनदार बबन आंबेरकर, ट्रस्टी सतेज चव्हाण, प्रशिक्षक भाई राणे, सुरेश चौकेकर, मालवण पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गावडे आदी मान्यवर तसेच ४० प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.