चौके (प्रतिनिधी) : जमिनीचे आरोग्य उत्तम राखणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असून रासायनिक खतांचा संतुलित वापर व त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा मुबलक वापर करुन जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे अस्तित्व कायम राखले पाहिजे जेणेकरुन येणारे पिक हे शाश्वत असेल असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी उमाकांत पाटील यांनी तळगाव येथे बोलताना केले.
5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून तालुका कृषि अधिकारी, मालवण, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व ग्रामपंचायत तळगांव यांच्या वतीने तळगाव ग्रामपंचायत सभागृह येथे किसान गोष्टी व तालुकास्तरीय जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी जागतिक मृदा प्रतिज्ञा घेतली. उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक (मृद विभाग) विजय पालसांडे यांनी केले. तसेच आंबा पिकात सलग तीन वर्षे उत्तम कामगिरी करत असल्यामुळे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेले कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी शेतीतील आपले अनुभव उपस्थितांसमोर कथन केले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी, कणकवली उमाकांत पाटील, तालुका कृषि अधिकारी एकनाथ गुरव, तळगांव सरपंच लता खोत, मंडळ कृषि अधिकारी, पोईप राजाराम चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी हुसेन आंबर्डेकर, मंडळ कृषि अधिकारी, मालवण सिताराम परब, कृषि पर्यवेक्षक, कट्टा श्रीपाद चव्हाण, कृषि पर्यवेक्षक, पोईप दशरथ सावंत, कृषि सहाय्यक अमृता भोगले, विद्या कुबल, आनंद धुरी, पवनकुमार सौंगडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अमृता भोगले यांनी मानले.