फोंडाघाट चा अमित कदम ठरला ” स्वस्तिक श्री ” चा महाविजेता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कुडाळ येथे स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फोंडाघाटचा सुपुत्र अमित अनिल कदम याने दमदार कामगिरी करत “स्वस्तिक श्री 2026” किताब पटकावला आणि महाविजेता होण्याचा मान मिळवला.या स्पर्धेत एकूण ५ गटांमध्ये स्पर्धा पार पडली. प्रत्येक गटात जिल्हाभरातून आलेल्या नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या अंतिम फेरीत अमित कदम यांनी उत्कृष्ट स्नायूंची बांधणी, स्टेज प्रेझेन्स, पोझिंग कौशल्य आणि संतुलित शरीरयष्टी यामुळे परीक्षकांची मने जिंकली.

अमित कदम हे व्यावसायिक बॉडीबिल्डर असून त्यांनी यापूर्वीही विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदक मिळवले असून आता त्यांचे पुढील लक्ष्य “भारत श्री” स्पर्धेसाठी तयारी करण्याचे आहे.या यशामुळे फोंडाघाट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाप्रेमींकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. प्रशिक्षक, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अमित कदम यांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले आहे.

error: Content is protected !!