फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटच्या आयक्यूएसी विभागाच्या वतीने दि. ०७ मार्च २०२६ रोजी अंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे मानवी समाजाची प्रगती वेगाने होत असली, तरी २१ व्या शतकात हवामान बदल हे एक गंभीर जागतिक आव्हान म्हणून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा लोकसंख्येच्या वितरणावर, मानवी आरोग्यावर, शहरीकरणावर, शेती, मत्स्यपालन तसेच विविध आर्थिक क्रियांवर होणारा परिणाम या विषयांवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे.
मानवी विकासाच्या प्रक्रियेत मूलभूत गरजा पूर्ण होत असताना जीवन अधिक सुखकर झाले आहे. मात्र या विकासाचा पर्यावरण, शेती, लोकसंख्या रचना आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम गंभीरपणे विचारात घेणे आवश्यक झाले आहे. शाश्वत विकास साध्य करण्यासाठी संभाव्य उपाययोजना, धोरणात्मक दिशा आणि आंतरराष्ट्रीय अनुभव यांचा ऊहापोह या परिषदेत केला जाणार आहे.
या परिषदेस देश-विदेशातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अफगाणिस्तानचे अब्दुल वाकील, गोवा येथील गव्हर्मेंट कॉलेज खंडोला येथील प्रा. डॉ. प्रबिर कुमार रथ, कोकण जिओग्राफर्सचे अध्यक्ष डॉ. शिवराम ठाकूर, तसेच इजिप्तचे डॉ. मोहम्मद अझीझ, नेपाळचे डॉ. कन्हैया सकपोटा आणि बुरुंडीचे जान्वियर न्दुवायेझु हे मान्यवर विविध सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी, प्राध्यापकांनी व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. ही परिषद शाश्वत विकासाच्या दिशेने विचारमंथन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.











