बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीचे वार्षिक ५ पुरस्कार जाहीर; प्रथमच महिला एन.सी.सी. अधिकाऱ्यांचा सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीने आपले सन २०२५-२६ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० असे आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा (त्या पैकी २ महिला) यांचा समावेश आहे. प्रथमच महिला एन.सी.सी. अधिकाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट येथे १८ वर्षे एन.सी.सी ए.एन.ओ. म्हणून काम करताना मेजर पदापर्यंत गेलेल्या आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य असलेल्या, मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दाभोळ-गुजर आळी (दापोली) येथील व्यवसायाने किराणा मालाचे व्यापारी असलेले परंतु वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात स्वखर्चाने लाखभर रुपयांची विविध विषयांवरील शेकडो पुस्तके खरेदी करून खाजगी संदर्भ ग्रंथालय निर्माण केलेले आंबा बागायतदार प्रविण पर्शुराम गुजर, साडवली देवरुख येथे ऑफसेट प्रिंटींग आणि बुक बाईंडिंगचा व्यवसाय करताना १५० पेक्षा जास्त देशांची नाणी व नोटा जमवण्याचा छंद जोपासताना गेल्या २६ वर्षात देवरुख दशक्रोशीत वीज वहन यंत्रणेत बिघाड झाल्यावर आपला वेळ देऊन पदरमोड करून लोकांची गैरसोय दूर करून जनमित्र बनलेले अमेय अशोक लिमये, सोगमवाडी-देवाचे गोठणे राजापूर येथील दगडात कोरलेल्या अतिप्राचीन श्री नागदोबा देवस्थानाचे मानकरी म्हणून सुमारे ३० वर्षे भाविकांची सेवा तसेच घनदाट जंगल, बारमाही न आटणारी नागदोबा कोंड (जलस्त्रोत) व प्राचीन कातळशिल्पे यांचे संवर्धन करणारे सदानंद तानाजी झिंबरे आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे (तालुका सावंतवाडी) येथील वयाची ७५ वर्षे पूर्ण करूनही गेली २६ वर्षे दररोज अप-डाऊन असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून काकडी, भाजी, हंगामी उत्पादने विकणाऱ्या स्वयमरोजगारीत सुलोचना अंकुश जाधव (गावकार) या ४ जणांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्राप्त ५ व्यक्तींपैकी रत्नागिरी बाहेरील ४ सन्मानिताना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी स्पीड पोस्ट आणि बँक हस्तांतरण द्वारे दिली जाणार आहे. मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांचा गौरव शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.

error: Content is protected !!