सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन कार्यक्रम केवळ शासकीय कार्यक्रम राहता नये, तो सामाजिक कार्यक्रम झाला पाहिजे. यात जिल्ह्यातील नागरिक सहभागी झाले पाहिजेत. तसेच देश सेवा करणारे सैनिक, त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती कृतज्ञता केवळ ध्वज निधी देवून व्यक्त होणार नाही. तर प्रत्येकाने त्यांना सन्मान दिल्याने, शासकीय कार्यालयात त्यांची कामे वेळेत केल्याने कृतज्ञता व्यक्त होवू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन मंडळाच्या जुन्या सभागृहात सशस्त्रसेना ध्वज निधी संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 9 डिसेंबर २०२४ रोजी पार पडला.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, जिल्हा सैनिक कल्याण सहाय्यक अधिकारी उदय आईर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, तसेच माजी सैनिक, वीरमाता, विरपिता, विर पत्नी, त्यांची मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. दीपप्रज्वलन आणि माजी सैनिक स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पोलीस बँड पथकाने वाद्य वाजवून तसेच ओरोस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गावून कार्यक्रमाला प्रारंभ केला.