सांघिक व वैयक्तिक खेळात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कब्बडी,खोखो सह गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक,१०० व २०० मीटर धावणे, रस्सीखेच, रिले, कॅरम, बुद्धीबळ यांसारखे अन्य खेळ व लगोरी, आट्यापाट्या यांसारखे काही पारंपरिक खेळ देखील या महोत्सवामध्ये पार पडले. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्याहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील खेळाडूंनी पटांगणावर क्रीडा संचलन सादर केले. संचालक शरद नारकर यांनी नाणेफेक करून सामन्यांची सुरवात केली. क्रीडा खेळ यांकडे केवळ करमणूक म्हणून न पाहता करीयर म्हणून पहावे जिवनात प्रत्येकाने खिलाडू वृत्ती आंगीकरली पाहिजे असे मत उद्घाटन प्रसंगी कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. प्रशालेचे क्रीडा शिक्षक एस.टी.तुळसणकर, आर.बी.चौगले यांनी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. विजेत्या संघाला व विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.














