चौके येथे मंगळवारी रात्री घडली घटना
चौके (प्रतिनिधी) : चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दिपक सखाराम परब (बावकर) वय 55 यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. चौके स्थळकरवाडीत राहणारे दिपक सखाराम परब(बावकर)हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत. गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा खोलण्याचा प्रयन्त केला मात्र दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने खोलता आला नाही. पडवीतून आगीचे लोळ येत होते.याबाबत चौके पोलीस पाटील यांना कल्पना देण्यात आली. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येत मालवण पोलीस ठाणे येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दिपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिणी ने मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला.
यावेळी घटनास्थळी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल जानकर, प्रतीक जाधव, महादेव घागरे, हेमंत पेडणेकर, चौके पोलीस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते. आग नेमकी कशी लागली हे समजण्यात आले नाही. पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत. यावेळी प्रीतम गावडे, मंदार गावडे, बंड्या गावडे, प्रतीक गावडे, मोहन गावडे, भाई गावडे यांच्यासह अनेक युवकांनी व ग्रामस्थानी आग विजवण्यासाठी धाव घेतली. जळलेल्या मयत दिपक(बावकर)याचा मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. दिपक परब यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.















