दाजीपूर खिंडीपासून फोंडा- नांदगाव रस्त्यावरील जीर्ण खड्डेमय रस्त्यामुळे हॅम प्रोग्राम खात्याला आणि किती अपघात व बळींची अपेक्षा ? संतप्त सवाल

फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता खड्ड्यात ! चालकांची कसरत ! अपघातांच्या भीतीने वाहतूक कोंडी

संबंधित खात्याच्या सक्षम अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी लक्ष देऊन रस्ता वाहतुकीस सुलभ करावा; ग्रामस्थांची आग्रही मागणी

…अन्यथा नाईलाजास्तव आंदोलनाचा इशारा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पावसाळा संपून सुमारे दोन महिने होत आले तरी देखील, मोठ्या धुमधडाक्यात नांदगाव तिठा येथे शुभारंभ झालेल्या रस्त्याचे, काम चालू झालेले नाही. याबाबत चौकशी करता, सिंधुदुर्गचे दक्ष अधिक्षक अभियंता यांनी हा रस्ता केंद्र सरकारच्या हॅम हायब्रीड ॲम्युनिटी प्रोग्रॅम कडे वर्ग झाल्याने आमच्या विभागाकडे या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी नसल्याचे सांगितले.

गेल्या वर्षी फोंडाघाट बाजारपेठेच्या रुंदीकरण व गटारीकरणासाठी १ कोटी ७७ लाख रुपयांचे काम सुरू होऊन विविध कारणास्तव अन् त्यात पावसाळा आल्यामुळे बंद करण्यात आले.तसेच फोंडा- हवेलीनगर-विद्यानगर गटारीकरण व रस्त्याचे लाखो रुपयांचे काम सुरू होऊन सध्या अपूर्ण आहे.जर हा रस्ता हॅम कडेच वर्ग होणार होता तर,ह्या कोटीच्या कोटी- लाखो रुपयांचे काय झाले ? कुठे गेले ?असा संतप्त सवाल फोंडावासीयांकडून विचारला जात आहे.

देवगड- हैदराबाद हा रस्ता केंद्र सरकारच्या हॅम – हायब्रीड ॲम्युनिटी प्रोग्रॅम कडे वर्ग झाल्यावर, पावसाळ्यानंतर आणि शुभारंभा नंतर या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होणे गरजेचे होते. काम कधी सुरू होणार ? याबाबतची विचारणा करण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये सदरची कार्यालय नाहीत.या योजनेचे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन अथवा जबाबदार खात्याचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर अथवा एस.ई.चे कार्यालय सिंधुदुर्गात नाही. सर्व कार्यालय मुंबईमध्ये ! त्यामुळे पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी कोण करणार ? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कामाचे टेंडर – वर्कऑर्डर, निखिल कन्स्ट्रक्शन ला दोन महिन्यांपूर्वी दिली असताना, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर वचक का नाही ? यामागे काही घपला किंवा आर्थिक व्यवहार झाला आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यात घाट रस्त्यावरील खड्ड्यात हेलकावल्यामुळे पेट्रोल- डिझेल टँकर उलटून चालकाचा कोळसा झाला. नांदगाव रोडवर तर दोन-तीन व्यक्तींना वाहनासकट खड्ड्यात पडल्यामुळे मरणाला सामोरे जावे लागले. फोंडा- बाजारपेठ ते घाट प्रारंभा पर्यंत रस्ता एवढा जीर्ण व खड्डेमय झाला आहे की, रोज छोटे-मोठे अपघात घडतच असतात, शिवाय ग्रामस्थांना प्रकृती अस्वस्थ व दुखापतीमुळे त्रास होत आहे. गगनबावडा- वैभववाडी- आंबोली घाट -मार्ग जड वाहतुकीसाठी बंद असल्याने, सर्व गाड्या -वाहने फोंडा -घाट मार्गे जात आहेत. पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटक सुद्धा याच घाटाला प्राधान्य देतात.याकडे पाऊस संपला तरीही हॅम- निखिल कन्स्ट्रक्शन आणि संबंधित जबाबदार खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय हलगर्जीपणा बद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबद्दल सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येऊन सिंधुदुर्ग- जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरविले असून, सात दिवसाच्या खड्डे कायमस्वरूपी भरून रस्ता सुलभ- सुखावह न झाल्यास गाडी रोको सारखे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

error: Content is protected !!