डॉ. शरयू आसोलकर यांना शिक्षक भारतीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

बालिका दिनानिमित्त ३ जानेवारीला वितरण होणार

तळेरे ( प्रतिनिधी) : शिक्षक भारतीच्यावतीने दि.३ जानेवारी रोजी ‘बालिका दिनाचे औचित्य साधून डॉ. शरयू आसोलकर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाहक संजय वेतुरेकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रशांत आडेलकर, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव समीर परब, संघटक आकाश पारकर तसेच सर्व जिल्हाउपाध्यक्ष याशिवाय महिला आघाडी प्रमुख सुष्मिता चव्हाण, महिला आघाडी सचिव प्रगती आडेलकर व इतर पदाधिकारीसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. शरयू आसोलकर मॅडम, यांचे उल्लेखनीय शैक्षणिक कार्य “चालवू वारसा सावित्रीचा, घेतला वसा शिक्षणाचा चोहीकडे पसरवू प्रकाश विद्वत्तेच्या तेजाचा” ज्ञानदानाचे व्रत घेऊन गेली 33 वर्षे आपण संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे मराठी विषयाचे अध्यापन करत आज मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. प्रभावी अध्यापनातून महाविद्यालयीन युवकांच्या जाणिवा समृद्ध करताना स्वतःच्याही उत्कट भावना शब्दबद्ध करत आपण साहित्य निर्मिती केली आहे. तुटले पण पुन्हा बांधून घेताना हा कवितासंग्रह, ओळ अनमोल हे संपादन, विविध नियतकालिकांमधून केलेले समीक्षा लेखन, ललितलेखन ,पुस्तक परीक्षणे या माध्यमातून साहित्य चळवळीमध्ये आपला क्रियाशील सहभाग राहिला आहे. प्राध्यापिका म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच मुंबई विद्यापीठाच्या विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतानाच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सिंधुदुर्ग साहित्य संघ, नवाक्षर दर्शन नियतकालिकाचे संपादक मंडळ अशा साहित्य विश्वामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थांच्या आपण क्रियाशील सदस्य आहात. मातृभाषा मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयोजित अनेक चर्चासत्रे, आकाशवाणी कार्यक्रम, काव्य मैफिली यामध्ये आपला सातत्याने अभ्यासपूर्ण सहभाग राहिला आहे. आपल्या कवितांचा समावेश अभ्यासक्रमात करून मुंबई विद्यापीठाने त्यांचे साहित्यमूल्य अधोरेखित केले आहे.

प्राध्यापिका व लेखिका-कवयित्री म्हणून आपण दिलेल्या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांड.मय पुरस्कार – बहिणाबाई पुरस्कार, विशाखा पुरस्कार तसेच मुंबई विद्यापीठाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपणास गौरवण्यात आले आहे. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पहिल्या भारतीय शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी साजऱ्या होणाऱ्या बालिका दिनाचे औचित्य साधून आपल्यासारख्या सावित्रीच्या लेकीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करताना शिक्षकभारती या शासन मान्य शिक्षक संघटनेला विशेष आनंद होत आहे. डॉ. शरयू आसोलकर यांच्या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे संस्थापक माजी आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे राज्यध्यक्ष अशोक बेलसरे,आणि प्रमुख कार्यवाह संजय वेतुरकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!