सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पार केला व्यवसायाचा ६ हजार कोटींचा टप्पा

अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती

जिल्हा बँकेचा आताचा प्रगतीचा वेग राज्यात सर्वाधिक

ओरोस (प्रतिनिधी) : ३१ मार्च २०२४ अखेर जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय ५३९१ कोटी रुपये एवढा होता. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यात बँकेने ६३४ कोटींची व्यवसायामध्ये वाढ केली आहे. परिणामी बँकेने सहा हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बारा महिन्यांचे उद्दिष्ट बँकेने केवळ नऊ महिन्यात पूर्ण केले आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या नऊ महिन्यांच्या आर्थिक कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक दिलीप रावराणे, विठ्ठल देसाई, समीर सावंत, प्रकाश मोर्ये यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी दळवी यांनी जिल्हा बँकेने चालू आर्थिक वर्षअखेर ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ५३९१ कोटी रुपये एवढा होता. मात्र बँकेने डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या नऊ महिन्यामध्येच एकूण व्यवसायामध्ये ६३४ कोटींची वाढ करीत एकूण व्यवसाय ६०२५ कोटी पर्यंत नेलेला आहे. एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने आर्थिक वर्ष संपणेपूर्वी तीन महिने आधीच साध्य केलेले आहे ही उल्लेखनीय बाब आहे.

error: Content is protected !!