स्व.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचा कुक्कुट पालन संगोपनाचा अभिनव उपक्रम

पदवी घेतल्यानंतर कोणीही बेरोजगार राहू नये स्वावलंबी व्हावं यासाठी हा उपक्रम उपयोगी पडेल !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडा घाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण उपक्रम या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण घेत आहेत. कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी,आत्मनिर्भर व्हावे, आणि कोणताही विद्यार्थी बेरोजगार राहू नये,असा या प्रशिक्षणाचा हेतू आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करणे आणि पूर्ण वर्षभर रोजगाराचा स्त्रोत चालू राहावा हा या मागील प्रशिक्षणाचा उद्देश आहे. कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराचे साधन उपलब्ध होण्यासाठी या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

या उपक्रमात विद्यार्थीनी ,मांसल कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्या यापैकी कोणत्या जातीची निवड करावी, पक्षांच्या निवारा शेडची उभारणी कशी करावी , पिल्ले आणण्याच्या अगोदर शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण कसे करावे ,लहान पिल्ले आणल्यानंतर त्यांचे विविध हंगामात ब्रूडिंग कसे करावे , पक्षांचे विविध आजार व त्या आजारासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरण केव्हा व कसे करावे, पक्ष्यांच्या वाढीच्या दरम्यान त्यांच्या वयानुसार खाद्य व पाणी व्यवस्थापन कसे करावे, पक्ष्यांच्या चोची केव्हा व कशा पद्धतीने कापाव्या ? तसेच त्याचे फायदे तोटे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती पद्धतीने खाद्य कसे तयार करावे आणि पक्षांना पूरक खाद्य म्हणून अझोला उत्पादन कसे घ्यायचे, अझोला खाद्य वापरताना कोणती काळजी घ्यावी आणि किती प्रमाणात खाऊ घालावा ? याबरोबर पूर्ण वाढ झालेल्या पक्षांची विक्री स्थानिक व बाहेरील बाजारपेठेत कशा पद्धतीने करावी याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थी विघ्नेश रेड्डी, भरतकुमार, सौरभ पुजारी, दुर्वेश रावराणे, रामा रेडकर, सिद्धी साळसकर, ऋतुराज सावंत, प्रीतम शेळके, सानिका शिंदे, ओंकार शिरतोडे, कोमल ताड, अविनाश तोडकर, विराज उगले, दीपक वाडेकर, विजयकुमार, तेजस गोसावी, अनिकेत तांदळे, यशश्री पुजारी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना उपक्रम प्रमुख प्राध्यापक सुशील कुमार मोटे , प्राध्यापक पियुष शिर्के, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सदर उपक्रमासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाट या संस्थेचे अध्यक्ष दीपेश मराठे,मिताली मराठे तसेच संस्था सचिव विद्या राणे पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!