फोंडाघाटचा सुपुत्र आणि नांदगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष महेश, ( पपी ) सापळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धट्ट्यांनी निधन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावचे सुपुत्र, बालगोपाळ मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आणि नांदगाव व्यापारी संघाचे हरहुन्नरी अध्यक्ष महेश (पपी ) सापळे यांचे नांदगाव मुक्कामी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.आज नांदगाव व्यापारी संघाची श्रीसत्यनारायण पूजा होती. पूजा संपन्न झाल्यावर महेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. तातडीने औषधोपचारासाठी कणकवलीस नेत असताना, वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. खेळाडू वृत्ती, मिश्किल सर्वांसाठी धावून जाणारा, सार्वजनिक उपक्रमात नियोजनापासून निरोप समारंभापर्यंत सक्रिय वावर असलेला कार्यकर्ता, आज – अर्ध्यावर डाव सोडून निघून गेला. त्याचे सर्व शिक्षण फोंडाघाट येथे झाले.बाल गोपाळ मंडळ तसेच स्थानिक उपक्रमामध्ये सदैव मित्रांसोबत पुढे असत. नांदगावला चायनीज सेंटर घातल्यानंतर गेली दोन टर्म ते नांदगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष होते. दोन्ही गावात ते मित्र-परिवारामध्ये लोकप्रिय होते. खिलाडू वृत्तीमुळे सर्वांना पुढे घेऊन जाण्यात त्याचा हातखंडा होता.
त्यांच्या जाण्याने सच्चा मित्र गमावल्याचा शोक, बालगोपाळ मंडळ फोंडाघाट, व्यापारी संघ फोंडाघाट तसेच नांदगाव व्यापारी संघ आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे त्यांचे पश्चात वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. मंगळवारी फोंडाघाट वैकुंठभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत











