तब्बल 11 वर्षांनंतर राणे कुटुंबीयांकडे पुन्हा पालकमंत्रीपदाची धुरा
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची धुरा मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्याकडे सोपवली आहे. तब्बल 2014 नंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा राणे कुटुंबियांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे आली आहेत. वडील नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवून पालकमंत्री पदाच्या माध्यमातून नामदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेतील ही सिंधुदुर्गवासीयांची अपेक्षा आता लवकरच प्रत्यक्षात उतरेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडेच जनतेचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नामदार नितेश राणे यांचे नाव आज घोषित करण्यात आले. देशात मोदींच्या सत्तेत खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे, राज्यात महायुती सरकार मध्ये मंत्री असलेले आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले नितेश राणे यांच्यामुळे आणि जोडीला आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या साथी ने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासाचा वारू आता चौफेर उधळेल हे नक्की.