कणकवलीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी गारांचा पाऊस

कणकवली (प्रतिनिधी) : परिसरात आज २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. गारांसह पाऊस पडल्याने वातावरणात अधिकच गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. बाजारपेठेत तसेच रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी आसरा घेण्यासाठी धाव घेतली. काही ठिकाणी मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. अनेकांनी घराबाहेर येत पावसाचा आनंद घेतला. दरम्यान, गारांसह झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घराबाहेर ठेवलेल्या काचेच्या सजावटी वस्तू, काचेच्या खिडक्या तसेच उघड्यावर उभ्या असलेल्या वाहनांना गारांचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली होती.

हवामान खात्याने यापूर्वीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हा अंदाज खरा ठरत गुरुवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. तथापि, काही भागांमध्ये या अवकाळी पावसामुळे किरकोळ गैरसोयीही निर्माण झाल्या. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. तरीही, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी गारा पडल्याने गरव्याचा सुखद अनुभव घेतला. धुळीने भरलेले रस्ते स्वच्छ झाले असून हवेतही ताजेपणा जाणवू लागला आहे.

तथापि, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः आंबा, काजू यांसारख्या हंगामी पिकांवर या पावसाचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तरी काजू आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

error: Content is protected !!