निमअरुळेत डीपी कोसळली : पाच गावांचा वीज पुरवठा खंडीत
वैभववाडी (प्रतिनिधी) : अवकाळी झालेला मुसळधार पाऊस व चक्रीवादळाचा फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. चक्रीवादळात निमअरुळे येथे वीज वितरणची डीपी (रोहीत्र) जमीनदोस्त झाली आहे. यामुळे खोरीतील पाच गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. करूळ जामदारवाडी येथील शंकर अनंत पांचाळ यांच्या घराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच धांदल उडाली. निम अरुळे येथील डीपी (रोहित्र) चक्रीवादळात जमीनदोस्त झाले आहे. त्याचबरोबर डीपी नजीकचे सहा वीज खांब सुद्धा पडले आहेत. त्यामुळे कुर्ली, सडूरे, शिराळे, अरुळे व निम अरुळे या पाच गावाचा पुरवठा पूर्णता खंडित झाला आहे. वीज वितरणचे अधिकारी तसेच ठेकेदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुसळधार पावसाचा फटका करूळ जामदारवाडी येथील शंकर अनंत पांचाळ यांच्या घराला बसला आहे. घरावरील पत्रे उडून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पाण्याची टाकी फुटली. त्या पाण्यात बुडून पंधरा कोंबडी मृत्यूमुखी पडली आहेत. वैभववाडी पंचायत समीतीच्या उपसभापती साची कोलते यांनी पांचाळ यांच्या घरी जात पाहणी केली आहे. श्री पांचाळ यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सौ. कोलते यांनी केली आहे.












