खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजोपयोगी कार्याची परंपरा जपत झाराप तिठा मित्र मंडळाने यंदाही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळामार्फत दरवर्षी सादर करण्यात येणाऱ्या दशावतार नाटकांच्या कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शाळा, रुग्णालयांना आर्थिक मदत देण्याबरोबरच गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठीही मंडळाने उदारहस्ते योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या सलग चार वर्षांपासून हे कार्य सातत्याने सुरू असून यंदा पाचव्या वर्षीही मंडळाने आपली सेवा अखंडित ठेवली आहे. यावर्षी मंडळाने रस्त्यावरच्या निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रमास रुपये ३१,७०० /- रुपये ची आर्थिक मदत तसेच कपड्यांच्या स्वरूपात सहाय्य केले. या मदतीमुळे आश्रमातील गरजू बांधवांना सन्मानाने जीवन जगण्यास मोठा आधार मिळणार आहे. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांच्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही मदत नुकतीच सुपूर्द केली. यावेळी हेमंत फणसेकर, निलेश महादेव डगरे (रा. तेरसे बांबर्डे), समीर हळदणकर (रा. साळगाव), संदीप अनंत दळवी (रा. वाडोस), अमृत तातावडे (रा. आंबेरी) आणि पांडुरंग डिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या झाराप तिठा मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
झाराप तिठा मित्र मंडळाकडून संविता आश्रमास मोलाचे सहाय्य











