इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरातील रामनवमी सोहळा संस्थानी थाटात….!

आचरा (प्रतिनिधी) : सकाळच्या प्रहरी सहस्त्र किरणे घेऊन आलेल्या रवीराजाच्या सोबतीने कसबा आचरे गावांतील रयत नित्याची कामे करण्यात गढून गेली होती. सूर्य जसजसा डोईवर येऊ लागला तसतसा कसबा आचरे गावात लगबग वाढली.
कसबा आचरे गावात गुरुवारी श्री देवरामेश्वर मंदिराचा सभामंडप भाविकांनी फुलून गेला. हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आले. त्याचवेळी दुपारी १२.३५ वा. च्या मुहूर्तावर रामजन्माची ‘जय जय रघुवीर समर्थ’ समर्थ’ अशी ललकारी होताच तोफा दणाणल्या. बंदुकीच्या फैरी आकाशात झाडल्या गेल्या. मंगल वाद्ये वाजू लागली. नगारखान्यात नगारे-ताशे झडूलागले. श्रीराम जन्म होताच येथे इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. आचरानगरीचा ऐतिहासिक राम जन्मोत्सव सोहळा पहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

सर्वत्र जिल्ह्यात गुरुवारी रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला होता. मालवण तालुक्यातील आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थाच्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटात अतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.

डोळ्यांचे पारणे फेडणारा राम उत्सव
इनामदार रामेश्वराच्या पूरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. आचरा पंचक्रोशी गेले १२ दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्यात सांब सदाशिव पुरता दंग झाला होता. रामेश्वर मंदिर मंडपात रामजन्मोत्सव साजरा होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ जयघोष सुरू झाला.

आचरा पंचक्रोशी गेले १२ दिवस रामनामात दंग
‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ जयघोष
श्रींची पंचारतीसह महालदार, चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा, गुलाल, अक्षतांची उधळण; रामनामाची गीते सादर केली गेली.

वाद्यांच्या गजरात सजविलेल्या पाळण्यात श्री रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. गुलाल, अक्षतांची उधळण झाली. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थच्या जयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली. श्रींची पंचारतीसह महालदार, चोपदार, छत्रचामर, अबदागीर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा करण्यात आली. रामनामाची गीते सादर करण्यात आली. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामजन्माचा आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ्यात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी सहभागी झाले होते. माजी आ. वैभव नाईक या सोहळ्यास उपस्थित होते.

रामनवमीच्या दिवशी सायंकाळी ६ वा.
गायक- पं.श्री. गिरीश संझगिरी (मुंबई) संवादिनी-सिद्धेश ठक्कर तबला साथ- पं. श्री. गिरीश नलावडे, यांनी केली.

अधिकाऱ्याचा भेटी
श्री देव रामेश्वर मंदिरात रामजन्मला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे, अप्प्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी हजेरी लावली. आचरा गावातील तलाठी, पोलीसपाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!