गुरुवर्य काकतकर ट्रस्ट तर्फे महिलांकरिता आयोजित मोफत शिवणकाम (फॅशन डिझाईन) प्रशिक्षण वर्गाचा सांगता सोहळा संपन्न

चौके (प्रतिनिधी) : चौके येथे गुरुवर्य पा. काकतकर विद्यार्थी कल्याण ट्रस्ट तर्फे आयोजित ४५ दिवसांच्या फॅशन डिझाईन प्रशिक्षण वर्गाचा सांगता सोहळा व प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम नुकताच ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राधाकृष्ण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी राधिका जोशी यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष करलकर यांनी केले. प्रशिक्षणार्थीनींतर्फे तृषा गावडे व विशाखा चौकेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वांना कौशल्यपूर्ण व उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाल्याने आपण शिवणकाम व्यवसाय करू शकतो व कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो असा आत्मविश्वास व्यक्त केला. सर्व जणींनी प्रशिक्षण काळात शिवलेले विविध डिझाईनचे ब्लाऊज व पंजाबी ड्रेस सोबत आणले होते. ते पाहून सर्व मान्यवरांनी समाधान व आनंद व्यक्त केला.

दरम्यान प्रशिक्षणाच्या शेवटी घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक १.तृषा तुषार गावडे, २.सलोनी समीर पाटकर, ३.चैतन्या चंद्रकांत गावडे यांना अध्यक्ष जोशी सरांनी उद्घाटनाच्या वेळी जाहीर केल्या प्रमाणे स्वत:च्या वतीने अनुक्रमे रुपये १५००/-, १०००/-, ५००/- ची रोख बक्षिसे विजेत्यांना दिली. तसेच सर्व ३५ प्रशिक्षणार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्रे देण्यात आली.

अध्यक्ष राधाकृष्ण जोशी सरांनी ट्रस्टला रु. तीन लाखांच्या देणगीचा धनादेश करलकर यांच्याकडे सुपूर्द केला. रामचंद्र (राजू) गावडे यांनी प्रशिक्षणासाठी आपली प्रशस्त जागा विना मोबदला दिली त्याबद्दल ट्रस्ट तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक भाई राणे व साधना ठाकूर यांनी मर्यादित कालावधीत उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणार्थी महिलांनी उत्स्फूर्तपणे दोन्ही प्रशिक्षकांना भेट वस्तू दिल्या.

कार्यक्रमाला खजिनदार बबन आंबेरकर, सुरेश चौकेकर, कमलाकर गावडे, विजय चौकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!