होमगार्ड कडून दोन युवकांना गांजाची ऑफर; माल खरेदी चौकशी भाजपा पदाधिकाऱ्याकडे केली आणि फसले

कणकवली (प्रतिनिधी) : गांजा देतो असे सांगत दोन कॉलेज युवकाना कणकवली लगत कलमठ गावात नेणाऱ्या होमगार्ड ला भाजपा पदाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. झाले असे की गुरुवार १३फेब्रुवारी रोजी दुपारी जानवली येथे सिगारेट ओढत असलेल्या दोन युवकांना मद्यधुंद अवस्थेतील त्या होमगार्ड ने तुम्हाला चांगला माल देतो असे म्हणत त्यांच्याकडून ५०० रु घेऊन दुचाकीने लगत च्या कलमठ गावातील एका वाडीत नेले. तिथे जात एका घराकडे इशारा करत या ठिकाणी माल मिळेल असे सांगून त्या युवकाला गांजा घेण्यासाठी पाठवले. पण नेमके घर माहीत नसल्याने तो युवक गांजा हवाय असे सांगत भाजपच्या पदाधिकाऱ्याकडेच माल हवाय म्हणत चौकशी करू लागला. भाजपा पदाधिकाऱ्याने कसला माल विचारताच गांजा असे उत्तर त्या युवकाने दिले. हे ऐकताच त्या पदाधिकाऱ्याचा पारा चांगलाच चढला. त्याने त्या युवकाची खरडपट्टी काढत कोणासोबत आलास अशी विचारणा करताच त्या युवकाने तो होमगार्ड थांबलेले ठिकाण सांगितले. त्या ठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्याने जाऊन चौकशी करताच त्या होमगार्ड ने आपले खरे आडनाव न सांगता सावंत असे आडनाव सांगितले. अखेर कणकवली पोलिस ठाण्यात याबाबत माहिती मिळताच पोलिसांची गाडी जेव्हा घटनास्थळी आली तेव्हा सदर होमगार्ड चे आडनाव वेगळेच असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या होमगार्ड ला गाडीत बसवताना त्याने माझ्या वरचेही अडकतील असे म्हटल्याचे स्थानिक नागरिकांत चर्चा आहे. दरम्यान सदर होमगार्ड हा आज कणकवली कोर्ट ड्युटीवर असल्याचे बोलले जात होते. कोर्ट ड्युटीवर असलेला होमगार्ड ड्युटी सोडून बाहेर आलाच कसा ? त्याला कलमठ मध्ये गांजा कुठे मिळतो हे कसे माहिती ? माझे वरचे अडकतील असे त्या होमगार्ड च्या म्हणण्याचा अर्थ काय ? असे प्रश्न नागरिकांत विचारले जात आहेत. एकीकडे खुद्द एसपी अग्रवाल साहेब अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणार असे म्हणतात. पालकमंत्री नितेश राणे यांनीही याबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांत कोणाचीही गय करू नये असे निर्देश दिले असतानाच कणकवली पोलिस ठाण्यात ऑन ड्युटी असलेल्या होमगार्डने केलेल्या या गंभीर घटनेबद्दल स्थानिकांत चीड व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची कणकवली पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद अथवा गुन्हा दाखल नव्हता.दरम्यान ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याबद्दल त्या होमगार्ड ची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कार्यवाही सुरू होती.

error: Content is protected !!