कणकवली (प्रतिनिधी) : गेली २० वर्षांहून अधिक काळ शिक्षक नसतानाही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांचा देवगड तालुका श्री विश्वकर्मा सुतार समाज संस्था, देवगड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. देवगड आरे फाटा येथे सृष्टी निर्माता विश्वकर्मा जयंती निमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मेस्त्री यांच्या हस्ते सचिव सुनिल मेस्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदाशिव पांचाळ यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार केला.
या प्रसंगी अध्यक्ष रविंद्र मेस्त्री, सचिव सुनिल मेस्त्री, अरूण पांचाळ, अरूण मेस्त्री, अंकुश मेस्त्री शिरगाव, दिपक मेस्त्री, अंकुश मेस्त्री वानिवडे, दिपक मेस्त्री पडेल, महिला मंडळ अध्यक्षा दिपिका मेस्त्री, महिला मंडळ सचिव वेदिका मेस्त्री, महिला मंडळ उपाध्यक्षा प्रिया मेस्त्री, स्नेहल मेस्त्री, विनिता मेस्त्री, सीमा पांचाळ अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य कृष्णा साळुंके यांचा शिष्य कु. यश प्रकाश मेस्त्री (आरे – देवगड) याने नोव्हेंबर २०२४ मध्ये पंजाब येथे श्री बाबा हरिवल्लभ संगीत प्रतियोगिता पखवाज कॅटेगरी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता, त्यानिमित्त यशचा यावेळी सत्कार करण्यात आला. नृत्यांगना कुमारी महिमा मंगेश वाडये, पोलिस कॉन्स्टेबल परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणारी कुमारी मिथिला भालचंद्र मेस्त्री, उत्कृष्ट चित्रकार कुमारी प्राची अंकुश मेस्त्री हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सदाशिव पांचाळ हे गेली २० वर्षे एज्युकेशनल एडव्हायजर म्हणून काम करताना महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यात मिळून सुमारे १७०० कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. ‘बुध्दि’बळ ही त्यांची अशी विशेष कार्यशाळा आहे जी ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शनपर करते, यामध्ये दुबई, मलेशिया, सिंगापूर, दोहा, कतार, अबुधाबी, साउदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका येथून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. ‘पाढ्यांची कार्यशाळा’ या कार्यशाळेच्या माध्यमातून एक लाख हून अधिक मुलांना पाढ्यांचे प्रशिक्षण विनामूल्य सदाशिव पांचाळ यांनी झाले आहे. हे कार्य अविरत सुरूच आहे.
आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेने समाजात चांगलं कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.












