डॉक्टर फ्रंटर्नीटी क्लब सिंधुदुर्ग व डॉक्टर क्लब कणकवली यांचे वतीने शिवपद मोहीम
शिवछत्रपतींच्या पालखीसह मिरवणुकीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत
खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती तथा किल्ले खारेपाटण संवर्धन समिती व ग्रामपंचायत खारेपाटण तसेच श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांचा शिवजन्मस्तोव सोहळा मोठ्या उत्साहात किल्ले खारेपाटण येथे सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा डॉक्टर फ्रंटर्नीटी क्लब व डॉक्टर फ्रायडे क्लब कणकवली,TVK ग्रुप रांगणा रनर्स आणि रागिनी यांच्या सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या कणकवली ते किल्ले खारेपाटण शिवपद मोहिमेचे किल्ले खारेपाटण संवर्धन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १५० डॉक्टर्स आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.किल्ले खारेपाटण संवर्धन समितीचे मंगेश गुरव व ऋषिकेश जाधव यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याबद्दल माहिती दिली.तर शिवपद मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व डॉक्टर व आयोजकांचे खारेपाटण शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अभिनंदन करत त्यानवमेदल प्रदान करण्यात आले.तर डॉक्टर क्लबच्या वतीने शिवपद मोहिमे करिता किल्ले खारेपाटण ची निवड केल्याबद्दल खारेपाटण किल्ले संवर्धन समितीच्या वतीने खारेपाटण येथील डॉ.प्रसाद मालांडकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त खारेपाटण एस टी बस स्थानक ते किल्ले खारेपाटण अशी शिवछत्रपतींची पालखी मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव,ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सुधाकर ढेकणे,शितिजा धुमाळे, दक्षता सुतार, माजी सरपंच व सकल मराठा समाज खारेपाटण चे अध्यक्ष रमकांत राऊत,खारेपाटण व्यापारी असो.अध्यक्ष चेतन हुले,श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटण चे विश्वस्त प्रवीण लोकरे,नंदू कोरगावकर,विजय देसाई सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर तसेच रिक्षा संघटनेचे सदस्य,महिला बचत गट सदस्य सी आर पी यांसह जि.प.केंद्र शाळेचे विद्यार्थी,खारेपाटण हायस्कूल विद्यार्थी लेझिम पथक व खारेपाटण सिनियर कॉलेज एन सी सी पथक तसेच विविध संस्थांचे व मंडळांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर किल्ले खारेपाटण येथे दुर्गादेवीला श्रीफळ अर्पण करून पाच शिवकन्याच्या हस्ते शिवप्रतीमेचे पूजन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र गीत गायन करून किल्ले खारेपाटण वर भगवा ध्वज फडकावून महाराजांना वंदना देण्यात आली.तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या आ वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी किल्ले जयगड ते किल्ले खारेपाटण अशी पायी दौड करत किल्ले खारेपाटण येथे शिवज्योत घेऊन आलेल्या युवकांचा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंगेश गुरव यांनी मानले.


















