भारतीय लष्करातील माजी सार्जंट शंकर जाधव यांचे निधन

पोलीस निरीक्षक सुशील जाधव यांना पितृशोक

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते ( बौद्धवाडी ) येथील रहिवासी भारतीय लष्करातील माजी सार्जंट तथा मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिवराम जाधव ( वय 91 ) यांचे पिसेकामते येथील राहत्या घरी बुधवार दि. 5 मार्च रोजी पहाटे दुःखद निधन झाले. भारतीय सैन्यदलातून सार्जंट पदावरून 16 वर्षांच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले होते. उत्कृष्ट फुटबॉलपटू असलेले शंकर जाधव हे भारतीय आर्मी च्या फुटबॉलटीम चे खेळाडू होते. उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून त्यांना वाढीव दोन वर्षे लष्करात सेवेची संधी देण्यात आली होती. 1962 सालचे भारत पाकिस्तान युद्ध तसेच 1965 आणि 1972 च्या युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. आर्मीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर शंकर जाधव यांनी 1974 साली मुंबई पोलीस दलात आपल्या शासकीय सेवेला सुरुवात करून 1992 साली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. पुणे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक सुशील जाधव , मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, सेवानिवृत्त मेट्रन प्रिती पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुलभा जाधव यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चत पत्नी दोन मुलगे, दोन मुली, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शंकर जाधव यांच्या पायावर काही दिवसांपूर्वी खुब्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र अचानक त्यांची तब्बेत खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहावर पिसेकामते येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!