निलेश राणेंनी पुरावे द्यावे अन्यथा जिल्ह्यातील त्यांचे विषय काढू
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कालच्या दौऱ्यादरम्यान राणे पिता-पुत्रांवर कोणतीही टीका केलेली नसताना आमदार निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करण्याचे कारण काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कणकवली तालुकाध्यक्ष आनंद पिळणकर यांनी उपस्थित केला आहे. ज्येष्ठ नेत्यावर एकेरी भाषेत टीका करणे योग्य नसून आमदार निलेश राणे यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील हे गेली ४० वर्षे विधानसभेचे सदस्य राहिलेले असून त्यांनी राज्यात अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही पराभव पाहिलेला नाही. २०१९ ते २०२२ या काळात त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले असल्याने पाझर तलाव आणि जलसंधारणाच्या विषयांबाबत त्यांना विशेष आस्था आहे, असे पिळणकर यांनी सांगितले. सासोली गावच्या दौऱ्यादरम्यान पिंगुळी गावातील ग्रामस्थांनी विनंती केल्यामुळे जयंत पाटील यांनी पिंगुळी येथील पाझर तलावालाही भेट दिली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात त्यांनी आमदार निलेश राणे यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. असे असताना निलेश राणे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका का केली, हेच आम्हाला समजलेले नाही, असे पिळणकर म्हणाले.
निलेश राणे यांच्याकडे सांगली विक्रीप्रकरणी काही पुरावे असतील किंवा साखर कारखान्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते जरूर समोर आणावेत. सध्या त्यांच्याकडे सत्ता आणि चौकशी यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी या प्रकरणांची चौकशी करावी. त्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही. मात्र, विनाकारण ज्येष्ठ नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते असून आमचे आदरणीय नेते आहेत. त्यांची राजकीय आणि सामाजिक संस्कृती वेगळी आहे. कितीही टीका झाली तरी ते कधीही आपली संस्कृती सोडून बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाबतीतही सुसंस्कृत भाषेचा वापर अपेक्षित आहे. आमच्या नेत्यांवर विनाकारण टीका सहन केली जाणार नाही. यापुढेही अशा प्रकारे टीका झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्न आणि विषयांवर आम्हालाही बोलावे लागेल, असा इशाराही अनंत पिळणकर कणकवली तालुका अध्यक्ष शरद पवार पक्ष यांनी दिला.












