कणकवली (प्रतिनिधी) : लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवाव्यात, या मत्स्य व बंदरे विकास मंत्री व पालक मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेनुसार आणि जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमध्ये विशेष मोहीम ग्राम स्तरावर राबवली. या योजनेच्या लाभापासून वंचित असलेले ३८ लाभार्थी महसूल यंत्रणेमार्फत शोधण्यात आले. त्यांना ७ लाख ६० हजार एवढा लाभ देण्यात येणार आहे. यामुळे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या कर्तव्यदक्षपणाचे सर्वच स्तरातून कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या विशेष मोहिमेला आले यश कौतुक होत आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभयोजना ही राज्य शासनाची काहीशी दुर्लक्षित योजना आहे. यामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचा अकाली नैसर्गिक मृत्यू झाल्यास शासनातर्फे २० हजार इतके आर्थिक सहाय्य शासनामार्फत देण्यात येत आहे. यासाठी मयत व्यक्ती १८ ते ५९ वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असायला हवी अशी अट आहे. आतापर्यंत ज्यांना ही योजना माहीत आहे, त्यांनी अर्ज केल्यावर या योजनेचा लाभ दिला जात होता; परंतु कणकवली तहसील कार्यालयामार्फत फेब्रुवारी २०२५ या महिन्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. यात सर्व तलाठ्यांनी ग्रामपंचायत रेकॉर्ड तपासून मागील ३ वर्षांत १८ ते ५९ या वयोगटातील मयत झालेल्या व दारिद्र्यरेषेखाली असलेल्या व्यक्तींची यादी तयार केली. कणकवली तालुक्यात केलेल्या सर्व्हेनुसार, ३८ नवे लाभार्थी शोधण्यात आले. या प्रत्येकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रे व अर्ज भरून घेण्यात आले आहेत. त्यामुळे शासनाकडून या ३८ लाभार्थ्यांना ७ लाख ६० हजार इतका लाभ देण्यात येणार आहे. या सर्वांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहीत नसल्याने हे सर्व लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते. तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखेतील नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, अव्वल कारकून दिलीप पाटील, हेमा तोरस्कर, अनिता बागवे व सर्वांनी विशेष मोहीम घेऊन स्वतःहून या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यामुळे या लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या माध्यमातून राबवलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
