देवगड (प्रतिनिधी) : गेल्या तीनशे वर्षांपासून काळाच्या ओघात हरवलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये उत्सवाचे आनंदमय वातावरण पसरले. या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांच्या कृपेने आणि आदेशाने यावर्षी प्रथमच होळी पौर्णिमेच्या दिवशी देव होळी उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यंदाच्या महाशिवरात्रीला श्री देव रामेश्वराची कुणकेश्वर भेट घडली होती. या पवित्र प्रसंगानंतर रामेश्वराच्या हुकूमानेच गावाने ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तीन गावांच्या जनतेच्या सहकार्याने होळीचा मांड पुन्हा उभारण्यात आला आणि होळीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.
यंदाची देव होळी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार साजरी करण्यात आली. उत्सवाच्या प्रमुख विधींमध्ये कल्पवृक्ष (माड) होळी उभारणी हा सर्वात महत्त्वाचा सोहळा होता.होळी उभारण्यासाठी लागणारा कल्पवृक्ष (माड) गावातील विजय काळे यांच्या बागेतून तोडण्यात आला. त्यानंतर वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या निनादात हा कल्पवृक्ष रामेश्वर मंदिरापर्यंत आणण्यात आला. कल्पवृक्षाच्या संपूर्ण खोडाला आंब्याच्या टाळांनी सजवून, टोकाला निशाण बांधण्यात आले आणि पारंपरिक पद्धतीने मांडावर होळी उभी करण्यात आली.
होळी उभारल्यानंतर गावकऱ्यांनी होळदेवाचे पूजन केले आणि सायंकाळी होळी दर्शनाचा सोहळा पार पडला. रात्री ९ वाजता अवसर काढण्यात आली, म्हणजेच होळी प्रदक्षिणा विधी पार पडला.या विधीत शिवकळेसह अन्य देवतांनी एकूण अकरा प्रदक्षिणा घालून होळदेवाला वंदन केले.उपस्थित मानकरी,गावघररयत आणि भाविकांनी या सोहळ्याचे दर्शन घेतले.पारंपरिक वाद्यांच्या निनादात हा सोहळा गगनभेदी जल्लोषात पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर पुढील पाच दिवस होळीच्या मांडावर जागर केला जाणार आहे. संपूर्ण मिठबाव, तांबळडेग, कातवण गावांमध्ये भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार झाले आहे.देव होळीच्या निमित्ताने गावकऱ्यांना पुन्हा एकदा पूर्वजांची परंपरा अनुभवण्याचा आणि तिच्या पुनरुज्जीवनाचा अभिमान वाटत आहे. या अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान गावच्या गाव घर रयतेला मिळाला. पारंपरिक पद्धतीने साजरा झालेला हा शाही थाटाचा सोहळा भविष्यातही अशीच परंपरा कायम ठेवेल, अशी श्रद्धा आणि विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. तीनशे वर्षांनी जुळून आलेली ही ऐतिहासिक परंपरा, भविष्यात अखंड राहो हीच श्री देव रामेश्वराच्या चरणी प्रार्थना !




