खुनाच्या गुन्ह्यात ललित देऊलकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : कालावल खाडीकिनारी रेवडी जेटी येथे नदीपात्रात वाळू उपसा करणारा कामगार हरिलाल सकरन सिंह याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ललित महादेव देऊलकर ( तोंडवली ,तळशील) याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादामुळे आरोपी ललित याला होळी जेलमध्ये साजरा करावी लागणार आहे. १९ जानेवारी २०२५ रोजी रात्री साडे अकरा वाजता आरोपी ललित देऊलकर सह अन्य आरोपींनी मयत हरिलाल व त्याचे सहकारी होडीची साफसफाई करत असताना त्यांना मारहाण केली. मयत हरिलाल याने जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली असता एकाने त्याच्या तोंडावर दांड्याने प्रहार केला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपी ललित देऊलकर याला २१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली असून २८ जानेवारीपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीतून जामीनावर मुक्तता होण्यासाठी आरोपी ललित याने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले.आरोपी ललित व अन्य आरोपींनी संगनमताने जीवघेणा हल्ला केला त्यात हरिलाल चा मृत्यू झाला. बीएनएस कलम १८३ नुसार महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविणे बाकी आहे.आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या गावाच्या शेजारी असून आरोपीला जामीन मिळाल्यास फिर्यादी व कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. महत्वाचे साक्षीदार हे परराज्यातील असून त्यांना बोलावून घेऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची ओळख परेड घेणे बाकी आहे.जामीन मिळाल्यास तपास सुरू असलेल्या या गुन्ह्यात आरोपीकडून हस्तक्षेप होण्याची तसेच साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी ललित देऊलकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश विद्या देशमुख यांनी नामंजूर केला.

error: Content is protected !!