ग्राहकांच्या जनजागृतीपर होणार कार्यक्रम
जिल्हा पुरवठा विभाग व तहसीलदार कार्यालय कणकवली यांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा पुरवठा कार्यालय सिंधुदुर्ग व कणकवली तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जागतिक ग्राहक दिनानिमित्त कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरच्या कार्यक्रमाला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तसेच पालकमंत्री नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई, प्रांताधिकारी जगदीश कातकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांना आपले हक्क व जबाबदारी या विषयी मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य योगेश खाडीलकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष व राज्य सदस्य प्रा. एस. एन. पाटील, पोलीस ठाणे सिंधुदुर्गनगरीचे प्रथमेश गावडे, भारतीय मानक ब्युरोचे पुष्पेंद्र मिश्रा, अन्न व औषध प्रशासनचे विजय पाचपुते, जिल्हा ग्राहक आयोगाचे माजी प्रभारी अध्यक्ष कमलाकांत कुबल आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.