बनावट घरपत्रक उतारा बनविल्या प्रकरणी गोळवण सरपंचांवर कारवाई झालीच पाहिजे

मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोळवण ग्रामस्थांचे जि. प. कार्यालयासमोर आंदोलन

४ दिवसात योग्य ती कारवाई करण्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन स्थगित

मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोळवण धवडकीवाडी येथील रघुनाथ चेंदवणकर यांच्या घराचा बनावट घरपत्रक उतारा बनविण्यात आला आहे. भाजपचे विद्यमान सरपंच सुभाष लाड यांनी हा बनावट घरपत्रक उतारा परप्रांतीय मुस्लिम धर्मीय असलेल्या समद किताबुल्ला चौधरी याच्या नावे बनवून दिला आहे. एकीकडे भाजप पक्ष मुस्लिम विरोधी भूमिका घेत असून दुसरीकडे भाजपचेच सरपंच परप्रांतीय मुस्लिम व्यक्तीला बनावट घरपत्रक उतारा बनवून देत आहेत. याच्या निषेधार्थ आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोळवण ग्रामस्थांनी ओरोस येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,भाऊ चव्हाण, बाळ महाभोज, राजु नाडकर्णी, समीर लाड, आनंद चिरमुले, सिद्धेश मांजरेकर यासंह गोळवण ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच हटाव गाव बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.दरम्यान यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) विशाल तनपुरे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मा. आम. वैभव नाईक व गोळवण ग्रामस्थांनी त्यांना निवेदन देऊन गोळवण सरपंच यांच्यावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी सुनावणी होणार असून येत्या ४ दिवसात योग्य ती कारवाई करू असे आश्वासन श्री.तनपुरे यांनी दिल्यानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले.

या प्रकरणात गोळवण सरपंच दोषी असून सरपंचांवर योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा ईशारा ग्रामस्थ भाऊ चव्हाण यांनी दिला.

error: Content is protected !!