ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धा : कथा पाठविण्याचे आवाहन

सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्गतर्फे उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबुराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली असून एकूण येणाऱ्या कथेमधून एका उत्कृष्ट कथेची बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. दोन हजार रुपये, स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप असून या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही. तरी सहभागी होणाऱ्या कथाकारांनी 30 एप्रिल २०२५ पर्यंत आपली एक कथा कुरियरने किंवा पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी केले आहे.

बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी बाबुराव बागुल कुटुंबातर्फे सम्यक संबोधी साहित्य संस्थेला प्रोत्साहित करण्यात आले आहे. बाबुराव बागुल यांनी मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. त्यांच्या परिवर्तन साहित्य विचाराचा प्रभाव कायम राहावा आणि याद्वारे त्यांचे कायम स्मरणही व्हावे या हेतूने त्यांच्या नावाने हा कथा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कोकणातील परिवर्तन साहित्य चळवळ म्हणून सम्यक संबोधी साहित्य संस्था ओळखली जाते. ही संस्था प्रादेशिकतेचा विचार करत नाही. परिवर्तन साहित्यातील जे जे चांगले आहे ते ते स्वीकारणे आणि आधीच्या कुठल्याही प्रदेशातील परिवर्तनवादी मराठी साहित्य विचाराला जोडून घेणे हा उद्देश ठेवून कार्यरत आहे. बाबुराव बागुल यांच्यासारख्या साहित्यिकाला जोडून घेणे ही या चळवळीची गरज वाटल्याने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून या कथा पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

कथेला विषय आणि शब्दांची मर्यादा नाही. कथा स्वतंत्र असावी. अनुवादित केव्हा आधारित नसावी. 30 एप्रिल पर्यंत प्राप्त होणाऱ्या कथेचा बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. मान्यवर साहित्य अभ्यासकांच्या परीक्षक मंडळातर्फे उत्कृष्ट कथेची बाबुराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. त्यात सम्यक संबोधी साहित्य संस्था पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत. कथा पुरस्कार विजेत्याला कणकवली येथे होणाऱ्या कथा पुरस्कार पारितोषिक सोहळ्यात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणे बंधनकारक असेल. तशी तयारी नसणाऱ्या कथाकाराला हा पुरस्कार दिला जाणार नाही. कथा पाठविण्यासाठी संपर्क – किशोर कदम, कलमठ – बौद्धवाडी. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग ४१६६०२ संवाद – 9422963655

error: Content is protected !!