होळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक्साईज इन्सुली चेक पोस्ट पथकाची कामगिरी
बांदा (प्रतिनिधी) : मनोज शेवरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी ढाब्याजवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे दि. १४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना ग्रे कलरची इनोव्हा चारचाकी वाहन क्र. MH-05-AS-7750 या वाहनाची तपासणी केली असता त्या चारचाकी वाहनाच्या पाठीमागील सीटवर व डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅन्डचे ४२ बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला. सदर प्रकरणी वाहन चालक- प्रथमेश दिपक भाटकर, वय 29 वर्षे रा. तवसाळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं.रु.3,25,200/- किंमतीचे मद्य व रु.10,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण अं.रु.13,25,200/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई भानुदास खडके, निरीक्षक, प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, विवेक कदम, दुय्यम निरीक्षक, धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, दिपक वायदंडे, जवान, सागर सुर्यवंशी, जवान, अभिषेक खत्री, जवान यांनी केली.













