ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 10 ते 17 मार्च 2025 या मुदतीत आयोजीत “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” हा उपक्रम संपन्न झाला असून एकूण 45 मेळावे आयोजित करुन 1700 ज्येष्ठ नागरिकांशी थेट सुसंवाद साधण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष व प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेवून त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे सर्वच पोलीस अधिकारी यांना आदेशित करण्यात आलेले आहे. 8 फेब्रुवारी 2025 रोजी ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित मेळावा घेवून ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन नं. 7036606060 चे लोकार्पण करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील ग्रामीण व दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिकांशी थेट सुसंवाद होण्यासाठी 10 ते 17 मार्च 2025 या मुदतीत सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या स्तरावर “ज्येष्ठ नागरिक थेट संवाद” उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एकूण 45 मेळावे आयोजित करुन 1700 ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद साधण्यात आला. या मेळाव्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजना, सुरक्षात्मक उपाययोजना, सायबर व आर्थिक फसवणूकीचे गुन्हे, आपत्कालीन हेल्पलाईन नं. 112, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नं. 7036606060 इत्यांदीबाबत माहिती देण्यात आली.तसेच ज्येष्ठ नागरिक एकनाथ काशिराम चुडजी, वय 75 रा. तुळस, ता. वेंगुर्ला यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप भोसले व महिला पोलीस अंमलदार रंजिता चौहान यांनी तात्काळ दखल घेवून त्यांना आपुलकीची वागणूक दिली व त्यांच्या समस्येचे तात्काळ निराकरण केले म्हणून पोलीस अधीक्षक अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेवून पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन 7036606060 यावर संपर्क साधावा. तसेच आपत्कालीन हेल्पलाईन 112, पोलीस नियंत्रण कक्ष, व्हॉटस्अप नं. 827577621, सायबर हेल्पलाईन 1930, सिंधुदुर्ग पोलीस Website – https://www.sindhudurgpolice.gov.in/ येथे देखील पोलीस मदतीची सुविधा उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक यांना करण्यात आले आहे.












