उमेदच्या माध्यमातून महिला उद्याेजकांना सहकार्य करणार

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आश्वासन

ओरोस (प्रतिनिधी) : उमेद अभियान अंतर्गत कार्यरत बचत गटाच्या उद्योग करणाऱ्या महिलांचे मी विशेष कौतुक करतो. त्यांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय विभागामार्फत मिळणारे सहकार्य, तसेच उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांचे मार्फत शंभर दिवस सात कलमी कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी 19 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित महिला उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, काजू महिला उद्योजक , उत्पादक गटाचे प्रतिनिधी यांच्याशी आपल्या दालनात बैठक घेवून संवाद साधला. यावेळी आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकिस प्रोत्साहन या घटकातर्गत गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रतिनिधी यांच्या उद्योगाबाबत सद्यस्थिती बाबत माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांच्या उद्योगाचा आढावा घेतला. या बैठकीस समर्थकृपा महिला समूह खारेपाटणच्या जागृती पोटले, कोकणरत्न उत्पादक गटच्या वैशाली गवस, सिंधूसखी महिला उत्पादक कंपनी संचालक श्रेया मोर्ये, क्रांती महिला प्रभागसंघाच्या श्रीम. कुवळेकर, पी एन जी कश्युचे संचालक प्रणाली गावडे, आराधना अगरबत्ती समूहाचे तन्वी सावंत, माणगाव प्रभागसंघ अध्यक्ष शबनम नाईक, रियाना शेख इत्यादी महिला उद्योजकानी उपस्थित राहत आपली उत्पादनाची प्रक्रिया व त्यांचे विपणन याबाबत विस्तृत माहिती दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांनी महिलांच्या उद्योगाचे विशेष कौतुक केले. त्यांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय विभागामार्फत मिळणारे सहकार्य, तसेच उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल याबाबत सर्व महिला उद्योजकांना या प्रसंगी आश्वस्त केले. या बैठकीच्या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!