बहुतेक मागण्या पुर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे बेमुदत साखळी धरणे आंदोलन अखेर आठव्या दिवशी स्थगित..

बऱ्याच प्रलंबित कामांचा झाला निपटारा!

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जि प.माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असलेल्या प्रलंबित कामांसाठी तसेच प्रत्येक प्रस्तावाची चेक लिस्ट मिळावी,संघटना सहविचार सभा घेण्यात याव्यात, थकित वेतन,मेडिकल बीले, मुख्याध्यापक मान्यता,पोर्टल नियुक्त शिक्षक कर्मचारी नियमित मान्यता , वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी मान्यता व अन्य मागण्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने सलग आठ दिवस बेमुदत साखळी धरणे आंदोलन जि.प.च्या प्रवेशद्वारावर सुरू होते.

उपरोक्त मागण्यांपैकी बहुतांश मागण्या माध्यमिक शिक्षण विभागाने मान्य केल्याने सलग आठ सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर व जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर यांनी दिली.सदरचे आंदोलन सोमवार दि.१० मार्च पासून सुरु होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.त्यानुसार सलग आठ दिवस ८ तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने सहभागी होऊन साखळी धरणे आंदोलन यशस्वी केले.

आंदोलन काळातच अनेक प्रलंबित कामांचा झाला निपटारा

सन-२०१८-१९ पासुन प्रलंबित असलेली कामे टेबलवर येऊन बऱ्याच कामांचा निपटारा झाल्याचेही दर्शनास आले.हे या आंदोलनाचे फलित म्हणावे लागेल तर काही कामे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असून जर यामध्ये संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे दिसून आल्यास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा तिव्रतेने सुरू करणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अधिक्षक श्री .घोगळे यांची आंदोलन स्थळी भेट व आंदोलन मागे घेण्याची विनंती..
सिंधुदुर्ग जि प माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षक श्री घोगळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या वतीने संघटनेला लेखी स्वरुपात चेकलिस्ट सादर केली तसेच इतर सर्व मागण्या मान्य करीत आहोत असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. तसेच इतर उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करण्याचे हमी देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

आज आंदोलनाच्या आठव्या दिवशी राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, दोडामार्ग तालुका अध्यक्ष अरुण गवस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.तर आकाश पारकर, हेमंत सावंत,दत्तात्रय मारकड, संदीप नाईक अनिकेत वेतुरेकर, राकेश दाभाडे, नारायण कोठावळे, रामदास भिसे, सागर फाळके,गोपाळ ठाकूर,सौ.स्नेहा कांदळगावकर ,महादेव मोटे, प्रशांत पालव, रमेश कांबळे, सुधीर प्रभाळे दीपक बोडेकर,रोहन भोगले यांच्यासह अन्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. सलग आठ दिवस सुरू असलेल्या या साखळी धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून आंदोलन यशस्वी केले.

error: Content is protected !!