सिंधुदुर्ग ( ब्युरो ) : राजकारण, समाजकारण करताना प्रस्थापितांकडून विरोध हा होतच असतो. खरेतर काम करणार्या व्यक्तीला विरोध करणे हा मानवी स्वभावाचा एक गुण आहे. मात्र सच्चा व धडाडीचा कार्यकर्ता अशा विरोधांनी खचून जात नाही, उलट जेवढा जास्त विरोध तेवढ्या जिद्दीने हा विरोध मोडून काढत काम करणारा कार्यकर्ताच खर्याअर्थाने सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व असते. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे सुपूत्र असलेले अनंत पिळणकर हे सुध्दा असेच एक जिद्दी व धडाडीचे नेतृत्व आहे. विरोध हा आपल्या पाचवीलाच पूजलेला आहे असे मानून निःस्वार्थी व जिद्दीने कार्यरत राहणारे हे नेतृत्व आज सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. आज 53 व्या वाढदिनानिमित्त अनंत पिळणकर यांचे शब्दरूपी अभीष्टचिंतन करताना त्यांच्या व्यक्तीमत्वाचा घेतलेला हा आढावा..
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली सारख्या दुर्गम गावात 3 एप्रिल 1970 रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले अनंत गंगाराम पिळणकर हे कुर्ली गाव व नवीन कुली वसाहतीच्या विकासासाठी झपाटलेले नेतृत्व. मुंबईतून सन 2008 साली गावी परतल्यापासून आजतागायत ते गावाच्या व वसाहतीच्या विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. स्वतः धरणग्रस्त असल्याने त्यांना धरणग्रस्तांच्या व्यथा चांगल्या ठाऊक आहेत. 2009 पासून त्यांनी कुर्ली गाव व नवीन कुर्ली वसाहत येथील विविध प्रश्न हाती घेत खर्या अर्थाने सामाजिक कार्यास सुरूवात केली आहे. देवधर धरणामुळे विस्थापित कुर्ली गावाचे फोंडाघाट नजीक माळरानावर पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासन नियमानुसार देय मुलभूत सुविधाही या पुनर्वसन गावठणात अजून नाहीत. अंतर्गत रस्ते, प्रकल्पग्रस्तांचे मोबदले, गावठणासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेली 12 ते 13 वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक कामासाठी एखादे व्यासपिठ मिळाले तर कामास बळ मिळते, या हेतूने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची खंबीर साथ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुर्ली गावातील तसेच पुनर्वसन गावठणातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. नवीन कुर्ली वसाहत विकास समितीच्या माध्यमातून ते शासन दरबारी अनेक समस्यांचा पाठपुरावा करत असतात.
स्वतंत्र ग्रामपंचायत मिळविणाराच : शासनाच्या पुनर्वसन नियमानुसार प्रकल्पग्रस्तांच्या गावठणाला स्वतंत्र ग्रामपंचायत देणे बंधनकारक आहे. मात्र नवीन कुर्ली वसाहतीला अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली ग्रामपंचायत निर्मिती अंतिम टप्प्यात आली होती. मात्र काही विरोधकांनी अल्पसंतुष्ट प्रकल्पग्रस्तांना हाताशी धरून यात खो घातला. मात्र काहीही झाले तरी नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मिळविणारच हा आपला ‘पन’ असल्याचे अनंत पिळणकर सांगतात.
विरोधकांना पुरून उरणार : राजकारण व समाजकारणात सक्रीय झाल्यापासून विरोध हा आपल्या पाचवीलाच पूजलेला आहे. माझे राजकारण व समाजकारण हे निःस्वार्थी आहे. तो काही आपला धंदा नाही. मात्र आपल्या धडाडीच्या कार्यपध्दतीमुळे तथाकथित अनेक लोकप्रतिनिधी व गावपुढार्यांची राजकीय दुकानदारी अडचणीत येते. यासाठी खोटेनाटे गुन्ह्यात मला अडकविण्याचा प्रयत्न होतो. अलिकडेच नवीन कुर्ली वसाहतीसाठी मंजूर जलजीवन योजनेचे काम लगतच्या लोरे गावातील काही लोकप्रतिनिधींनी चुकीच्या पध्दतीने राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण तो हाणून पाडला. कुर्ली वसाहत व गावाचा सर्वांगिण विकास हाच आपला ध्यास असल्याचे अनंत पिळणकर सांगतात.













