देवगड (प्रतिनिधी) : कोटकामते येथे दि.८ डिसेंबर २०१६ रोजी ग्रामपंचायतीची ग्रामसभा चालू असताना फिर्यादी गणेश लक्ष्मण घाडी यांना ग्रामसभेत शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रावजी गोविंद खाजणवाडकर,अनिल दत्तात्रय मोंडे, सुनील रामा कोकम, संजय दत्ताराम धोपटे यांची सिंधुदुर्गचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यानी निर्दोष मुक्तता केली आहे.याकामी आरोपी रावजी खाजणवाडकर यांचेतर्फे अॅड. कौस्तुभ मराठे तर अनिल मोंडे इत्यादींकरिता अॅड.बी.एम. दळवी यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, दि. 8 डिसेंबर २०१६ रोजी ११.०० वा. मौजे कोटकामते ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा चालू असताना दाभलवाडी येथील पायवाटेच्या कारणावरुन सभेत गोंधळ घालून अध्यक्षस्थानी असलेले सरपंच गणेश लक्ष्मण घाडी यांना मारहाण करुन ग्रामसभेच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच सरपंच व व सदस्यांना शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपींवर भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या खटल्यात सरकार पक्षाने तपासलेल्या साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती, उलटतपासा दरम्यान घटना शाबित न होणे या सर्व मुद्दयांच्या आधारे सर्व आरोपींची सिंधुदुर्ग प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.










