सरिता पवार यांना मध्यप्रदेश मधील वसंत राशीनकर काव्यसाधना पुरस्कार जाहीर

मध्यप्रदेश राज्यातील महत्वाचा पुरस्कार राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील आपले वाचनालय व श्री सर्वोत्तम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा अत्यंत महत्वाचा वसंत राशीनकर काव्यसाधना पुरस्कार अ. भा. सन्मान २०२४ जाहीर झाला असून जून महिन्यात मध्यप्रदेश इंदोर येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. इंदोर येथील आपले वाचनालय संस्थेचे सचिव संदिप राशीनकर यांनी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा केली. सरिता पवार यांच्या मराठी साहित्य विश्वातील बहुचर्चित ठरलेल्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संयत विद्रोहाची परिभाषा उलगडून दाखवताना मानवतावाद जपण्याचा संदेश कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहातील कवितांतून मिळतो. सरिता पवार यांचे कथा काव्य ललित लेख प्रसिद्ध असून राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार, काव्यरासिक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह,एटीएम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार, राज्यस्तरीय सारांश पुरस्कार मिरज,राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार बुलढाणा,राज्यस्तरीय आई पुरस्कार राजापूर, सावित्रीबाई फुले पुरस्कार वेंगुर्ले, कोमसाप चा नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार आदी महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मध्यप्रदेश राज्यातील मिळालेल्या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!