लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार
वैभववाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार , पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा, कृषी, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन २०२५ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कला व शैक्षणिक क्षेत्रात दिला जाणार पुरस्कारास अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी चे कलाशिक्षक मंदार चोरगे यांची निवड करण्यात आली आहे. मानाचा फेटा,शाला, श्रीफळ सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार एस.आर.मांगले, आर.व्ही.नारकर, रेश्मा भाईडकर, स्वप्नेश परब, व्ही.टी.देवण यांनी पुरस्कृत केले आहेत. संस्थेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष वाय.पी.नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. कला व शैक्षणिक क्षेत्रातील जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी कलाशिक्षक मंदार चोरगे यांची निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, विद्यार्थी व पालक यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन होत आहे. लवकरच पुरस्कार प्राप्त मान्यवरांना ज्ञानदीप मंडळाच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.













