कुडाळ (प्रतिनिधी) : पाट पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने आज सकाळी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी निवती पोलीस निरीक्षक सुनील राणे, उपनिरीक्षक संकेत पगडे, जिल्हा रुग्णालयातील डॉ. पद्मश्री हळदणकर, डॉ.शिमाली, जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई, उपसरपंच समीर धुरी, डॉ. भारतेंदु आवळे आदी उपस्थित होते. पाट वरचावाडा केंद्रशाळेत आयोजित या रक्तदान शिबिरात निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा रक्तदान शिबिरातील प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक सुनील राणे यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. गतवर्षीपासून पाट पंचक्रोशी ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिराला जिल्हा रूग्णालय ब्लड बँक स्टाफचे सहकार्य लाभले.













