चौके (प्रतिनिधी) : माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ॲड गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावचे मुख्याध्यापक उदय यशवंत जोशी हे आपल्या 32 वर्षे 10 महिने 24 दिवसांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर दिनांक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 1 मे च्या महाराष्ट्र दिनी सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सत्कारमूर्ती उदय जोशी यांच्या पत्नी डॉ. शुभांगी जोशी, संस्थाध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष अरुण भोगले, सचिव हेमंत हडकर, खजिनदार महादेव सुर्वे, सल्लागार तातू भोगले, कृष्णा वंजारे, दशरथ पडेलकर, शशिकांत सरनाईक, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका प्रतिभा आचरेकर, योगेश नाईक, गुरुनाथ ताम्हणकर, श्वेता हडकर, अमोल गोसावी, सुधीर पडेलकर, बाबुराव भोगले, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सेवानिवृत्तीपर सत्कार या कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय खोत म्हणाले की, मागील जवळपास 33 वर्षे उदय जोशी सर माळगाव हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत. नोकरीची सुरुवात जोशी सरांनी माळगाव हायस्कूल मधूनच करून याच प्रशालेतून ते सेवानिवृत्त होत आहेत. यापुढे जोशी सरांची उणीव आपल्याला सदैव भासत राहील. अतिशय शिस्तप्रिय समय सूचकता, स्वावलंबी, कार्यतत्पर, व विद्यार्थी प्रिय, हे गुण सरांचे वाखाणण्याजोगे होते. आपल्या सेवाकाळात जोशी सरांबद्दल प्रशालेत व संस्था पदाधिकाऱ्यांत चांगला समन्वय निर्माण झाला होता. मागील 3 वर्षे जोशी सर हे सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक झाल्यानंतर सरांनी प्रशालेला प्रगती पथावर नेण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या कसे सक्षम होतील यासाठी सरांची नेहमीच धडपड चालू होती. याही पुढे संस्था व प्रशालेला जोशी सर नेहमी च सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून जोशी सरांना त्यांचे पुढील सेवानिवृत्तपर आयुष्य सुखी समाधानी व निरोगी जावो अशी सदिच्छा डॉ. संजय खोत यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक उदय जोशी म्हणाले की, आपण आपल्या नोकरीची सुरुवात या प्रशालेतूनच केली या सेवाकाळात अनेक मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले. अनेक संस्थाध्यक्ष संचालक यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण केली मात्र आपल्याला या सर्वांचीच शैक्षणिक काळात मोलाची साथ मिळाल्याने आपण आपली सेवा यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो. याबाबत त्यांनी आपली पत्नी डॉ. शुभांगी जोशी यांनाही धन्यवाद दिले कारण शैक्षणिक आणि वैद्यकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील सेवा असून आपली पत्नी डॉ शुभांगी यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्राला तेवढेच मोलाचे सहकार्य केले. मुख्याध्यापक पदी विराजमान झाल्यावर जबाबदारी वाढली असतानाही आपल्या पत्नीने आपले मनोबल उंचावून सेवा पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. सेवानिवृत्त नंतरही आपण ज्या प्रशालेतून सेवानिवृत्त झालो. त्या प्रशालेचे ऋण फेडण्यासाठी निवृत्तीनंतर प्रशालेला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन जोशी यांनी दिले. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी आणि जोशी यांच्या मित्र परिवारातून त्यांना आपल्या मनोगतातून सेवानिवृत्तीपर शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सागर मिसाळ, तुकाराम गिरी, आर. के. बेनके, सिद्धीका जाधव, निकिता माळगावकर, रणजीत राणे, मधुकर पवार, नाऊ खरात, साईश खोत, यांच्यासहित आजी-माजी विद्यार्थी व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन निकिता माळगावकर तर आभार सागर मिसाळ यांनी व्यक्त केले.














