इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे. शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा असून शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच, हा महामार्ग रेडी बंदराता जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, असेही केसरकर म्हणाले.
आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे.” केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने 60 टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली, म्हणून आमचा विकास धांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे?” असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “नागपूरमध्ये फक्त वाघ दिसतात. आमच्या जंगलात पटेरी वाघ, काळा बिबट्या पाहायला मिळतो. नागपुरात समुद्र नाहीं. समुद्र पाहायला सिंधुदुर्गातच यावे लागते. शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नागपूरहून सुरु होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो तसाच शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरु झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.” असे श्री. केसरकर म्हणाले पर्यावरण चळवळी करणाऱ्यांना आमचा विरोध नाही पण जनतेच्या हिताच्या आड त्यांनी येऊ नये पर्यावरणाचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे असे केसरकर यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष खेमराज कुडतरकर, अशोक दळवी, नीता कविटकर, नारायण राणे आदी उपस्थित होते.












