चौके (प्रतिनिधी) : बारामती (शारदानगर) पुणे येथे नुकतेच ४ थे राज्यस्तरीय ‘अक्षर संमेलन’ संपन्न झाले. ‘माझी शाळा माझा फळा समुह’ आणि ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपेंट ट्रस्ट’ (बारामती) यांच्यावतीने भरवण्यात आलेल्या या संमेलनातील ‘अक्षर सन्मान सोहळ्यात वराडकर हायस्कुल कट्टा व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे कला शिक्षक प्रसिद्ध चित्रकार, रांगोळी कार समीर चांदरकर यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार रोहित पवार, एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदाताई पवार,महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महसूल व वन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर, गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट, उपसचिव चेतन निकम, संयोजक अमित भोरकडे, ज्येष्ठ चित्रकार संतोष लोणकर आदी उपस्थित होते.
पद्मश्री माननीय अच्युत पालव सर यांचे सुलेखन प्रात्यक्षिक व मार्गदर्शन, सुलेखन कला , फलक लेखन, व्यक्तिचित्र रांगोळी, गालीचा रांगोळी, फेस पेंटिंग, छत्रीवर सुलेखन, चित्र प्रदर्शन अशा विविध कलानी नटलेले हे संमेलन संस्मरणीय होते अशी माहिती पुरस्कार विजेते समीर चांदरकर यांनी दिली.












