जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तळेरे येथे दोन दिवसीय मार्गदर्शन सत्र व व्यसनमुक्ती शपथ

तंबाखूला नकार आरोग्यास होकार!

कासार्डे (प्रतिनिधी) : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन येथे दि. ३० व ३१ मे रोजी दोन दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेत व्यसनांपासून दूर राहण्याचा व समाजात आरोग्यदायी विचार रुजवण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा कार्यक्रम डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या प्रज्ञांगण – तंबाखू प्रतिबंध अभियान, तळेरे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.विशेष म्हणजे, १ मे ते ३१ मे या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात “अमली पदार्थ विरोधी महिना” म्हणून मोहिम राबवण्यात येत असल्याने या मार्गदर्शन सत्राला अधिक महत्त्व प्राप्त झाले.गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. अनिल नेरुरकर यांच्या मार्गदर्शनातून श्रावणी व सतीश मदभावे हे दाम्पत्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात तंबाखू, व्यसनमुक्ती आणि कॅन्सर प्रतिबंधक चळवळीचे कार्य सातत्याने करत आहे. त्यांनी ग्रामीण भागात जनजागृती, शाळा-विद्यार्थी संवाद, व्यसनमुक्त संकल्प अशा उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाचा वसा उचलला आहे.

मार्गदर्शन सत्राच्या पहिल्या दिवशी (३० मे) सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वावलंबन, नीतिमूल्ये आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर श्रावणी मदभावे यांनी तंबाखूचा इतिहास, त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम, व्यसनामुळे होणारे कौटुंबिक आणि सामाजिक नुकसान यावर माहिती देत विद्यार्थिनींना “व्यसनी जोडीदार टाळा – सुरक्षित भवितव्य निवडा” असा सल्ला दिला.

निर्व्यसनी व्हा, स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा- सौ.अर्पिता मुंबरकर”

दुसऱ्या दिवशी (३१ मे – जागतिक तंबाखू विरोधी दिन) नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रीमती अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना “निर्व्यसनी व्हा, स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा” या त्रिसूत्रीचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी तर आभारप्रदर्शन सतीश मदभावे यांनी केले. प्रा. श्री प्रशांत हटकर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात ७० ते ८० विद्यार्थी उपस्थित होते. मानवी साखळी आणि तंबाखू विरोधी घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली.
स्पर्शिका मदभावे, मेधांश मदभावे आणि स्वरूप परब या लहान मुलांनी व्यसनमुक्तीवर प्रभावी कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोशनी बागवे, स्मितेश पाष्टे, आशिष घाडी, आर्यन पांचाळ, यश खरात, सिद्धांत खांडेकर, साक्षी मेस्त्री, उपासना जाधव, श्रेया साळुंखे यांचे मोलाचे योगदान लाभले. श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे सर्व विद्यार्थीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक भान आणि “व्यसनमुक्त युवा – बलशाली भारत” या संकल्पनेचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.

error: Content is protected !!